Monday, 15 November 2010
मी.
मला हेच करायचं होतं का?? किंवा करायचं आहे का?
म्हणायला गेलं तर खुपच साधा प्रश्न, आणि म्हणायला गेलं तर खुपच अवघड सुद्धा.
गंमत म्हणजे, काल परवा पर्यंत असं वाटत देखील नव्हतं नेमकं काय चाललय माझ्या आयुष्यात, मस्तपैकी नौकरी आहे, पोटापुरतं मिळतंय, म्हंजे एकुण सुखात चाललय. पण मग अधुन मधुन हे असं अस्वस्थं का वाटायला लागलंय मला?. कधी कधी ते संदीप - सलील चं गाणं "आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरिने खरडुन कागद सहीस पाठवीतो.... " मला माझ्याबद्दलच लिहीले आहे असंच वाटायला लागतं. पण खरचं सांगायच तर सध्याच्या आयुष्याबद्दल तक्रार करण्यासारखं काहीच नाहीये पण तरीहि हे असं का वाटतय त्याचा काही पत्ता लागत नाहीये.????
Wednesday, 26 May 2010
दृष्टीकोन....
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.
' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.
आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.
आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.
राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.
आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्यांची सेवा करतात.
आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.
संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.
वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
Saturday, 15 May 2010
सलिल कुलकर्णीचा एक अप्रतिम लेख
‘हॅलो सर, मी बर्लिनहून बोलतोय! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई-वडील ठाण्यात असतात. बाबा म्हणतायेत तू शिक अजून. ते कर्ज काढतायेत, पण मला वाटतंय आता बस्स! मी पीएच.डी. झालोय..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता. माझ्या तोंडून फक्त.. हं.. हं..! ‘मी परत ठाण्याला चाललोय, बाबांना सांगणार आहे, तुम्ही रिटायर व्हा! माझे बाबा खरंच दमलेत हो.. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो, पण काय करावं सुचत नव्हतं. इंटरनेटवर ‘दमलेला बाबा’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं.’ आता माझ्या तोंडून ‘हं.. हं’ सुद्धा जात नव्हतं, इतका सुन्न झालो मी. एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता.. बाऽऽऽऽप रे! हे काय आहे? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़? की रसिकता़़़, हळवेपणा, खरेपणा.. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच, की ‘याला म्हणतात नातं.
‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही..’
हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- ‘आजचे आई-बाबा स्वत:मध्येच इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही! ..डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..
खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘बाबा..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘बाबा..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा प्रश्नांना बायकोच्या ‘हो..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही..’ असं म्हणणारा ‘बाबा’!
बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘बाबा’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना ‘तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का?’ म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..
या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!
अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?
माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब.’ ..कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.
असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता, फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.
प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी ‘माझ्या बाबाला का रडवलंस’ म्हणून आमच्यावर चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी ‘बाबा गाणं ऐकलंत?' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..
हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..
प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या, दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!!)
आम्हीही घरापासून दूर-दूर पुन: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की, या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं, पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग कमी करायला हवाय..
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..
‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला..’
Thursday, 25 March 2010
आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.
* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.
* ह्या पाट्या आहेत त्या ' आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या" ....
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्या दिवशी खेळता येईल.
३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये
Monday, 18 January 2010
पुलं'वरचा अप्रतिम लेख
लोकसत्ता लोकरंग,
रविवार, १५ नोव्हेंबर २००९
वसंतराव देशपांडे तल्लीन होऊन गात होते. पुढय़ात पु. ल. देशपांडे त्यांचं गाणं ऐकत बसले होते. तेही तेवढेच तल्लीन. ढगांचं दार लोटून सुनीताबाई कधी आत आल्या दोघांनाही कळलं नाही. समेवर पुलंनी आपला उजवा हात हवेत झटकून दाद दिली आणि डोळे उघडले तर पुढय़ात साक्षात सुनीताबाई उभ्या, कंबरेला पदर खोचून! पुलंच्या पोटात गोळा गोळाआला आणि चेहऱ्यावर अजीजीचे भाव आले.
अगं? तू आलीस? आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थझाल्याखेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजराकरायचा. बरं झालं आज नेमकी आलीस! भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंडउघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ! असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेलापाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांगकाहीतरी युक्ती मला.
वसंतरावांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत सुनीताबाईंनी चौफेर नजर फिरवली. सगळा परिसर अस्ताव्यस्त. पायजमा खाली पडलेला, कुडता भिरकावून दिलेला, टॉवेल गुंडाळी करूनपडलेला. पुढच्या मिनिटाचं आपलं भविष्य काय आहे ते पुलंना चटकन कळलं. त्यांनीशिताफीनं सुनीताबाईंचा हात धरला आणि म्हणाले, अगं आत्ताच आली आहेस नं, जरा बस दोन मिनिटं शांत आणि मग कर आवराआवर! पण सुनीताबाईंना कुठं धीर होता. त्याभाईकडं सात्त्विक रागानं पाहत म्हणाल्या, भाई, मला खरं खरं सांग, हा पायजमा इथं किती दिवसांपासून पडला आहे? त्यांच्या या प्रश्नावर वसंतराव फस्कन हसले. चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव आणण्याचा कमालीचा प्रामाणिक प्रयत्न करत पुलं म्हणाले, खरं सांगायचं तर नऊ वर्षांपूर्वी इथं स्वर्गात आलो तेव्हा पृथ्वीवरचे कपडे काढून इथले घातले, तेव्हापासून हा पायजमा असाच पडलेला आहे. तरातरा जात सुनीताबाईंनी तो पायजमाउचलला आणि म्हणाल्या, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, पण तेहीखोटंच म्हणायचं! यावर तिरकसपणे पुलं म्हणाले, ते तुला स्वत:वरूनही कळायला हरकत नाही. वसंतरावांनी मग तंबोऱ्याला गवसणी घातली आणि म्हणाले, काय म्हणतेय आपली पृथ्वी? टॉवेलची घडी घालत सुनीताबाई म्हणाल्या, पृथ्वी काय म्हणतेय ते बघायला माझे डोळे कुठं शाबूत होते? आणि काही ऐकायची इच्छाही नव्हती, आजच्या दिवसाची वाट बघत काढली नऊ वर्ष कशीतरी! दोन क्षण ओली शांतता पसरली. मग पुलंनी सूत्रं हातीघेतली आणि म्हणाले, सुनीता, इथं येऊन एकच गोष्ट लक्षात आली, स्वर्गसुख वगैरे जे काय असतं ना, ते स्थळावर अवलंबून नसतं, आपल्यासोबत कोण आहे, यावर असतंअवलंबून ते! तुझा धाक असण्यात मला जे स्वातंत्र्य होतं, त्याची सर कशालाच नाही. मग सुनीताबाईंनी भाईंचा हात प्रेमानं हाती धरला आणि म्हणाल्या, आता आलो आहोत ना आपण पुन्हा एकत्र!
सुनीताबाई आल्यामुळं पुलंच्या अंगात नवा उत्साह संचारला. घर आवरत असलेल्यासुनीताबाईंना ते म्हणाले, आपल्या पृथ्वीवर तो अमृततुल्य चहा मिळतो ना, तर ते साफ खोटं आहे. खरं तर मी आता चहातुल्य अमृत शोधतो आहे, कारण चहाची गंमत अमृतातनाही. मग ते वसंतरावांकडे पाहत म्हणाले, वसंता, चल कुठं दूध, साखर आणि चहा-पत्तीमिळते का बघू जरा. वसंतराव पुलंचा बालसुलभ उत्साह कौतुकानं पाहत होते. त्यांनीपुलंना वास्तवाची जाण करून दिली. अरे पीएल, बाहेर जागोजागी अमृताच्या टाक्याबसवल्या आहेत, चहासाठी तुला कुंपण ओलांडून नरकात जावं लागेल. ते ऐकून पुलंम्हणाले, पृथ्वीवरचा प्रत्येकजण पुण्याऐवजी पाप गाठीशी बांधण्यासाठी का धडपडतअसतो, ते इथं आल्यावर कळलं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कारण जिवंतपणीच तो दिसला तर कोणीच तिकडे फिरकणार नाही. मग चहाचा नाद सोडून पीएलनी बैठक मारली आणि म्हणाले, अगं सुनीता, जी.ए. इथंच राहतात, दोन घरं सोडून. तुला जर त्यांना पत्रवगेरे लिहायची असतील तर मी आहे कुरियर सव्र्हिससाठी. किचनचा ओटा साफ करताकरता सुनीताबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या, काही टोमणे मारायची गरज नाही भाई, मीत्यांना भेटायला जाणारच आहे.
पण पुलं कसले गप्प राहतात? त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तूयेणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगलविसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून! सुनीताबाईंनीसोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे? बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे? यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटूलागली तर मग मरून उपयोग काय? मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडीतपडत नाही काही करण्याच्या! सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं!
वसंतराव निघाले होते; पण मुगाच्या खिचडीचं नाव ऐकून ते थांबले. ते सुनीताबाईंनाम्हणाले, अगं, इथं काही लिहिता येणार नाही त्याला, इथं फक्त मौज मजा करायची असते. काम करायला बंदी आहे इथं. त्यावर पुलं म्हणाले, आता ही आली आहे ना इथं, उद्यापासूनइंद्र शेतात जाऊन नांगर धरेल आणि रंभा, उर्वशी जात्यावर बसून धान्य दळतील की नाही बघ! हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदललाआणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास? कोणाला दिल्यास? मुगाच्या डाळीवर पाणी ओतत सुनीताबाई म्हणाल्या, भाई, अरे देणाऱ्याला दिल्याचं सुख मिळावं असे घेणारे सापडणं मुश्कील झालंय. आपलं आयुष्य संपलं हे भाग्यच म्हणायचं.. अस्वस्थ मनानं वसंतरावांनी तंबोऱ्याची गवसणी काढून पुन्हा सूर लावला.