Saturday 27 August 2011

जाहिरातीत राहून गेलेली मालिका - http://www.saamana.com/ dtd: 28/08/2011

जाहिरातीत राहून गेलेली मालिका
हा काहीच न कळण्याचा मोसम आहे असे दिसते. कलियुग संपून सुरू झालेल्या ‘सावळागोंधळ युगात’ सगळेच समजण्यापलीकडले वाटणे काही धक्का लागण्यासारखे नाहीच. ‘जो दिखता है वो बिकता है’ हा हल्लीचा नियम आहे. अर्ध्या तासाची मालिका पाहायला बसलात की 15 मिनिटे जाहिरातीतच जातात. मालिका चालावी म्हणून जाहिरात की जाहिरात चालावी म्हणून मालिका आहेत हे गणित मात्र कळत नाही. आयुष्याचे तसेच काहीतरी होते. जाहिरातींच्या गाजावाजात मनाला भिडणार्‍या मालिकांकडे दुर्लक्ष होते. अशीच एक मालिका म्हणजे इरोम चानू शर्मिला.
14 मार्च 1972 रोजी कोंगपाल कोंगखाम लेकार्ड, पोरोमपस, इंफाळ येथे तिचा जन्म झाला. श्री. इरोम नंदा आणि इरोम सखी यांची ही कन्या. आठ भावंडांमध्ये शर्मिला नेहमीच उठून दिसायची. जनावरांवर प्रचंड प्रेम करणे आणि आपली सायकल फिरवत गावातील सर्वांना भेटणे हाच तिचा छंद होता. संपूर्ण गावाची लाडकी शर्मिला सतत सर्वांना मदत करीत असे. प्रत्येकाशी प्रेमाने बोलून समजून वागणे या तिच्या स्वभावामुळे ती सगळ्यांनाच आवडत असे. ती 12 वर्षांची असताना तिचे वडील गेले. 1997 मध्ये तिच्या मोठ्या भावाचेही निधन झाले. खूप शिक्षण घ्यायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे तसे जमले नाही. पण वाईट परिस्थितीने तिला तिच्या ध्येयापासून कधीच दूर केले नाही.
विचारवंत शर्मिलाने नेहमी सत्य व न्यायाचा मार्ग धरायचा हे मनाशी ठरवले होते. तिचे तत्त्वज्ञान व विचार वेळेबरोबर अधिक मजबूत व धारदार होत गेले. शिक्षण बारावीपर्यंतच करता आले, पण देशातील घडामोडी, साहित्य, मोठी व्यक्तिमत्त्वे यांचा अभ्यास तिने कधीच सोडला नाही. बातम्या पाहून तिचे मन नेहमीच तुटायचे. राजकारण आणि सामान्य नागरिकांची गळचेपी हा तिच्या जीवनातील अस्वस्थतेचे कारण ठरणारा मुद्दा आहे. हत्याकांड, मारहाण, अन्याय, मानवाधिकारांचे उल्लंघन हे सगळं का होतं असे तिने अनेकदा स्वत:लाच विचारले. गावातील थोरांशी चर्चा करताना ती आपल्या शंका त्यांच्यासमोर ठेवायची, पण उत्तरे कुणीच देऊ शकत नव्हते.
जस्टीस सुरेश यांच्या ‘पीपल्स ट्रिब्युनल’मध्ये तिचा सहभाग होता. हिंदुस्थानी सेनेतील एका जवानाने गावातील एका युवतीवर बलात्कार केल्याचे ऐकून तिचे हृदय थरारून निघाले. बरेच दिवस ‘ट्रिब्युनल’च्या या चर्चेत ती हरवलेली असायची. तिचे कशातही लक्ष लागत नव्हते अन्यायाविरोधात आपण का नाही लढत या विचाराने ती स्वत:ला छळत होती. ऑक्टोबर 2000 पासून तिचे विचारमंथन सुरूच होते. तेवढ्यात 2 नोव्हेंबर रोजी मालोम येथे तुलीहत्म विमानतळावर सुरक्षा दलाकडून 10 लोकांची हत्या करण्यात आली. शर्मिला आपली सायकल चालवत घटनास्थळी पोहोचली. त्या घटनेची ती प्रत्यक्षदर्शी आहे. सुरक्षा दलाने केलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ तिने 2 नोव्हेंबर 2000 पासूनच उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा अशी शर्मिलाची मागणी आहे. हा कायदा कोणतीही कायदेशीर कारवाई न करताच सुरक्षा बलांना गोळी मारण्याचे अधिकार प्रदान करतो.
लहानपणापासूनच ती गुरुवारचे उपोषण करायची. जगात अनेकांना जेवण मिळत नाही. मीही आठवड्यातून एक दिवस जेवणार नाही. हे तिने बरीच वर्षे पाळले. योगायोग असा की, 2 नोव्हेंबर 2000 सुद्धा गुरुवारच होता. उपोषण सुरू केल्यानंतर काही दिवसांतच शर्मिलाला अटक करण्यात आली. 5 नोव्हेंबर 2000 रोजी अटक झाली. कलम 306 म्हणजेच आत्महत्येच्या प्रयत्नांतर्गत तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे उपोषण थांबणार नाही अशी घोषणा शर्मिलाने न्यायालयातही केली. तिचे उपोषण तोडण्याकरिता व तिला जिवंत ठेवण्याकरिता जबरदस्तीने जवाहरलाल नेहरू इस्पितळात ठेवले. अत्यंत हाल करून लसीद्वारे नळ्या लावून तिला अन्न देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केले. कलम 306 ची सहा महिने-वर्षभराची सजा संपली की शर्मिला परत सुटली. नव्याने उपोषण सुरू केले. परत पोलीस येतात. तिला पकडून नेतात आणि परत तेच तेच. शर्मिला सांगते, मला पकडून धरले जाते. मी काहीच नाही करू शकत. मला सुया टोचल्या जातात. नाकात नळ्या लावल्या जातात. या परिस्थितीत मी फक्त सहन करते. पोलिसांच्या तावडीत ती वाचन करते, कविता लिहिते, लेख लिहिते. आताच तिची हाडे ठिसूळ झाली आहेत. वजन कमी होत चालले आहे. 11 वर्षांचे हे उपोषण तिचे शरीर करीत आहे. ती सांगते मालोममधील दृश्य मला अजून खाते. सामान्य जनतेने झेललेल्या गोळ्या मला झोपू देत नाहीत. त्या मृतांमध्ये 18 वर्षांचा सिनम चंद्रमनी होता. त्याला 1988 मध्ये हिंदुस्थान सरकारकडून शौर्य पदक मिळाले होते. त्याला आपल्याच सुरक्षा दलांनी गोळ्या घालून मारले. तेही उगाच. मी हे नाही विसरू शकत. 2004 साली जस्टीस जीवन रेड्डी यांची कमिटी बसवली गेली. सरकारला त्या कमिटीने हा कायदा बदलावा असा सल्लादेखील दिला पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. कायदा तसाच राहिला आणि शर्मिलाचे उपोषणही तसेच राहिले. आजही ती सामान्य माणसांच्या जगणे या अधिकारासाठी आपले आयुष्य त्यागून रोज संघर्ष करीत आहे.
उपोषण सुरू केले तेव्हा ती 28 वर्षांची होती. आज ती 39 वर्षांची आहे. तरीही सरकार झोपलेले आहे. बडे बडे तिला भेटून गेले व तिने उपोषण बंद करावे असे सांगूनही गेले, पण मदतीचा हात मात्र कुणाकडून आला नाही. तिचे आयुष्य आता जवाहरलाल नेहरू इस्पितळात नळ्या लावून सुटकेची वाट पाहणे आणि सुटल्यावर उपोषणावर जोर लावणे. सरकार जसे उठून बसले आहे, मीही तेच करणार असे ती ठामपणे सांगते. आज समाजसेवेलाही मार्केटिंग आणि पीआरची गरज आहे. ती कोणत्या राज्यकर्त्यांना ओळखत नाही. तिचा दिल्लीशी काहीच संबंध नाही. कुणी बाबा किंवा आध्यात्मिक गुरू तिला ओळखत नाही हेच तिचे दुर्दैव. नाही तर आज मणिपूरमध्येदेखील रामलीला मैदान भरले असते. आय. एम. शर्मिला अशा टोप्या कुणी छापल्या नाहीत आणि छापणारही नाही, पण शर्मिलाला त्याचे काहीच वाटत नाही. तसे पाहिले तर देशात जागोजागी रामलीला मैदान सजले पाहिजे. कुचकामी सरकार असले की अन्यायाशिवाय दुसरे काय मिळणार! आज संपूर्ण देश सरकारविरोधात भडकला आहे. प्रत्येकाला बदल हवा. जेवढे रस्त्यावर उतरले तेवढ्यांनी जरी मतदान केले तर बदल घडेल. शर्मिला एक सत्याशी आपली भेट घडवणारी एक मालिका आहे, ती जाहिरात नाही. तिचे पोस्टर नाही लागले. तिच्या जाहिराती टीव्हीवर नाही दिसल्या. मुळात देशाला शर्मिला कोण हेही नीट माहीत नाही. आपण फक्त जाहिरातीत गुंतलोय. जरा डोळे उघडा. टीव्हीवर जाहिराती पाहताना चुकून एखादी चांगली मालिकाही पाहा.
शर्मिलाच्या ‘गाजावाजा’विना चाललेल्या उपोषणाचे फळ तिला मिळो व तिच्या शौर्याची मालिका संपूर्ण जगात पसरो ही माझी इच्छा आहेे. पण एकमात्र आहे जाहिरातींनी मनोरंजन ‘सॉलिड’ होते.

Friday 8 April 2011

*स्मरण **'**फर्स्ट गिअर**'**चे !** *

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक
आणि गिअर बरोबर
झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून
एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट
गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे
मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न
थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार
नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका
कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं
विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं
आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.

समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.

गाडीचा वेग आणखी
वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर
म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर,
कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप
हॉटेलिंग, सणासुदीला
नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये
येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड
मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी
वाटू लागतो.

आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की
हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop,
ह्याउ नि त्याउ..!
या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो
हे आपल्यालाच
कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी...
खर्व.... निखर्व......रुपये
नाहीत, गरजा! हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, '
लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि...
... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.

गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....
खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात.
गाडी पूर्ण
थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता
याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता
होती...
आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.

गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला
गिअर टाकाल
?
सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट
गिअर' ?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या
जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? EMI भरत विकत
घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted' असं
लिहिलेल्या कागदाने ?

मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !

आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे
बाबा, निरागस
प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित'
म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको' नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास
होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात
आपल्याfrustration चा
‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर
तुमची गाडी ओढत नव्हते का ?

Don't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी
जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं
स्मरण ठेवूया.

आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.


सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट
गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.

त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर !


जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट
गिअर’ ?