Tuesday 3 January 2012

ऍटिट्यूड - Saamna Daily dtd: 01/012012

कॅनडामध्ये जन्मलेल्या जस्टीन हाइन्सला जन्मत:च ‘लारसन सिन्ड्रोम’ नावाचा असाध्य रोग आहे. त्यामुळे जस्टीन व्हीलचेअरला खिळून आहे. या रोगात शरीरातील सांधे निकामी होतात. त्याचे मोठे सांधे तर पूर्णत: निकामी आहेतच; पण मनगट, बोटे यामधले सांधेदेखील विचित्रपणे हलतात. व्हीलचेअर स्वयंचलित आहे म्हणून बरे नाही तर जस्टीन अंथरुणालाच खिळून राहिला असता. व्हीलचेअरद्वारा जस्टीन त्याचे सर्व व्यवहार करतो. सर्वत्र फिरतो. सर्वत्र म्हणजे अगदी सर्व जगभर फिरतो. कारण शरीर जरी अपंग असले तरी जस्टीनची ऍटिट्यूड अपंग नाही. ती नित्य नवी उंच भरारी घेत असते. जस्टीनची आई सांगत होती, ‘जस्टीनच्या जन्मानंतर डॉक्टरांनी जेव्हा मला त्याच्या असाध्य रोगाविषयी माहिती दिली तेव्हा मीच क्षणभर पॅरालाइझ झाले. त्याला कसे वाढवायचे हेच कळेना. मन, शरीर सुन्न होऊन गेले; पण मला जर कोणी आधार दिला असेल तर तो या मुलाच्या दिलखुलास हसण्याने. लहानपणीचे सगळे फोटो पहा. कुठच्याही फोटोत दुर्मुखलेला चेहेरा नाही. सगळ्यात त्याच्या चेहेर्‍यावर मनमोकळे हसू. जन्मत:च आनंदी वृत्ती घेऊन आलाय जस्टीन. त्याच्या उत्साहाने माझ्या निराशेला आशेत बदलवले. एकदा तो मला म्हणाला, ‘मॉम चालणे म्हणजे काय असते? कसं वाटतं चालताना?’ माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आले. ते लपवून घशात अडकलेला आवंढा गिळत मी चेहेर्‍यावर उसने हसू आणले व म्हटले, चल मी तुला चालवते. मी त्याला माझ्या पावलावर उभे केले, त्याचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले व माझ्या पायावरूनच त्याला हळूहळू चालवले. जेव्हा त्याला खाली उतरवले तेव्हा तो म्हणाला ‘हँ, काहीसुद्धा मजा आली नाही चालायची. उलट कष्ट. I think walking is overrated. व्हीलचेअरमध्येच मजा आहे. I am happy with my wheelchair’. त्या दिवसापासून त्याने कधीही मला का चालता येत नाही हा प्रश्‍न केला नाही. लहानपणापासूनच जस्टीन सुरात गुणगुणायचा. बोलायच्या आधी तो गायला, शिकला. वडिलाच्या ज्यूकबॉक्सवर गाणी ऐकत तो तासन्तास घालवायचा व तसे गाणे स्वत: म्हणायचा प्रयत्न करायचा. त्याची आजी त्याला चर्चमध्ये नियमितपणे घेऊन जायची व सर्वांसमोर गायला लावायची. त्यामुळे त्याची अपंग अवस्थेत लोकांसमोर जायची,गायची, बोलायची भीती गायब झाली. १४ वर्षांचा असताना त्याने एक रेडिओ स्पर्धा जिंकली व त्याला टोरांटोच्या टीमच्या एका खेळाला प्रेक्षकांसमोर गायची संधी मिळाली. त्याने त्या संधीचे सोने केले. लोकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. अफाट जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद ऐकून तो इतका आनंदला की त्या दिवसापासून त्याने गाणे हेच आपल्या आयुष्याचे लक्ष्य केले. आता तो स्वत:ची गाणी स्वत: लिहितो, त्याला चाली लावतो. त्याचे दोन गाण्यांचे अल्बमही निघाले आहेत. त्याच्या दुसर्‍या अल्बममधले "Say What you will. हे गाणे केवळ दोन महिन्यांत इतके लोकप्रिय झाले की त्यामुळे जस्टीन सर्व जगात पोहोचला. मागच्या वर्षी त्याने अपंग लोकांच्या शर्यतीत भाग घेतला व जणू त्याला त्याचे जीवनध्येय मिळाले. त्याने त्याचे गाणे व आयुष्य अपंग लोकांसाठी निधी गोळा करण्यासाठी उपयोगात आणायचे ठरवले आहे. चीन, अमेरिका, अरब देश सगळीकडे जस्टीन निधी गोळा करण्यासाठी गाणी म्हणत फिरतो. त्याच्या गाण्यामुळे त्याला त्याच्या आयुष्याची दिशा तर सापडलीच, पण प्रेमिकाही मिळाली. अपंग माणसाला प्रेमिका असा प्रश्‍न कोणाच्याही मनात येणे साहजिक आहे. पण ती त्याच्या बाह्य रूपावर नाही तर त्याच्या हृदय पिळवटून टाकणार्‍या गीतलेखनावर फिदा आहे. तिच्या लेखी तो इतका मोठा आहे की त्याचे अपंगत्व ही फारच क्षुल्लक बाब आहे. ती जस्टीनबरोबर त्याची सावली बनून जगप्रवास करते. त्याची व्हीलचेअर उचलून गाडीत ठेवते, त्याला व्हीलचेअरवरून फिरवते. कष्टाचे तिला काही वाटत नाही कारण त्या कष्टाच्या मोबदल्यात तिला तिच्या प्रियकराचे गाणे जवळून ऐकता येते. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या लोकांचा प्रतिसाद अनुभवता येतो. जस्टीनला लोक विचारतात की, इतक्या व्याधी असताना तो कसा नॉर्मल माणसासारखा जगू शकतो. जस्टीन म्हणतो की, ‘मी जन्मलो तोच हा असा. त्यामुळे मला दुसरे जीणेच माहीत नाही. माझ्या शारीरिक दोषांकडे लोकाचे लक्ष जाणे स्वाभाविक आहे म्हणूनच मी माझे गाणे जर इतक्या ताकदीचे बनवतो की लोकांचे लक्ष माझ्यावरून उडून जाऊन गाण्यात अडकावे. काय कमालीची ऍटिट्यूड आहे ना! सतत पॉझिटिव्ह विचार करणे, आपल्यातल्या फक्त उणिवाकडे बघून खंत न करणे, निराश न होता स्वत:तल्या चांगल्या गोष्टी शोधणे, शरीर साथ देत नसले तरी मनाच्या भरारीने स्वत:चे दैव बदलणे ही विजेत्याची लक्षणे आहेत. जगात जस्टीनसारखे अनेक विजेते आहेत ज्यांनी केवळ पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने आपल्या शारीरिक, मानसिक, सामजिक कमतरतेवर मात केली आहे. संख्याशास्त्रानुसार इंग्रजी भाषेतल्या प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट नंबर असतो. उदाहरणार्थ १ या नंबराची अक्षरे आहेत , A, J, दोन या क्रमांकाची अक्षरे आहेत B, K, T, तीनची C L U वगैरे वगैरे. त्याप्रमाणे ATTITUDE या शब्दातल्या अक्षरांची जर बेरीज केली तर ती १०० येते. नव्या वर्षात जाताना या १०० नंबरी शब्दाची गरज आहे. अशी ऍटिट्यूड की जिच्यामुळे आपण स्वत:चे व दुसर्‍याचे जीणे सुखद करू शकू, स्वत:हून स्वत:वर लादलेल्या कक्षा ओलांडू शकू. Wish you a very Happy, Healthy & Positive New Year.

No comments:

Post a Comment