हा काहीच न कळण्याचा मोसम आहे असे दिसते. कलियुग संपून सुरू झालेल्या ‘सावळागोंधळ युगात’ सगळेच समजण्यापलीकडले वाटणे काही धक्का लागण्यासारखे नाहीच. ‘जो दिखता है वो बिकता है’ हा हल्लीचा नियम आहे. अर्ध्या तासाची मालिका पाहायला बसलात की 15 मिनिटे जाहिरातीतच जातात. मालिका चालावी म्हणून जाहिरात की जाहिरात चालावी म्हणून मालिका आहेत हे गणित मात्र कळत नाही. आयुष्याचे तसेच काहीतरी होते. जाहिरातींच्या गाजावाजात मनाला भिडणार्या मालिकांकडे दुर्लक्ष होते. अशीच एक मालिका म्हणजे इरोम चानू शर्मिला.
विचारवंत शर्मिलाने नेहमी सत्य व न्यायाचा मार्ग धरायचा हे मनाशी ठरवले होते. तिचे तत्त्वज्ञान व विचार वेळेबरोबर अधिक मजबूत व धारदार होत गेले. शिक्षण बारावीपर्यंतच करता आले, पण देशातील घडामोडी, साहित्य, मोठी व्यक्तिमत्त्वे यांचा अभ्यास तिने कधीच सोडला नाही. बातम्या पाहून तिचे मन नेहमीच तुटायचे. राजकारण आणि सामान्य नागरिकांची गळचेपी हा तिच्या जीवनातील अस्वस्थतेचे कारण ठरणारा मुद्दा आहे. हत्याकांड, मारहाण, अन्याय, मानवाधिकारांचे उल्लंघन हे सगळं का होतं असे तिने अनेकदा स्वत:लाच विचारले. गावातील थोरांशी चर्चा करताना ती आपल्या शंका त्यांच्यासमोर ठेवायची, पण उत्तरे कुणीच देऊ शकत नव्हते.
जस्टीस सुरेश यांच्या ‘पीपल्स ट्रिब्युनल’मध्ये तिचा सहभाग होता. हिंदुस्थानी सेनेतील एका जवानाने गावातील एका युवतीवर बलात्कार केल्याचे ऐकून तिचे हृदय थरारून निघाले. बरेच दिवस ‘ट्रिब्युनल’च्या या चर्चेत ती हरवलेली असायची. तिचे कशातही लक्ष लागत नव्हते अन्यायाविरोधात आपण का नाही लढत या विचाराने ती स्वत:ला छळत होती. ऑक्टोबर 2000 पासून तिचे विचारमंथन सुरूच होते. तेवढ्यात 2 नोव्हेंबर रोजी मालोम येथे तुलीहत्म विमानतळावर सुरक्षा दलाकडून 10 लोकांची हत्या करण्यात आली. शर्मिला आपली सायकल चालवत घटनास्थळी पोहोचली. त्या घटनेची ती प्रत्यक्षदर्शी आहे. सुरक्षा दलाने केलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ तिने 2 नोव्हेंबर 2000 पासूनच उपोषण सुरू केले आहे. सुरक्षा बल विशेषाधिकार कायदा (एएफएसपीए) रद्द करावा अशी शर्मिलाची मागणी आहे. हा कायदा कोणतीही कायदेशीर कारवाई न करताच सुरक्षा बलांना गोळी मारण्याचे अधिकार प्रदान करतो.
उपोषण सुरू केले तेव्हा ती 28 वर्षांची होती. आज ती 39 वर्षांची आहे. तरीही सरकार झोपलेले आहे. बडे बडे तिला भेटून गेले व तिने उपोषण बंद करावे असे सांगूनही गेले, पण मदतीचा हात मात्र कुणाकडून आला नाही. तिचे आयुष्य आता जवाहरलाल नेहरू इस्पितळात नळ्या लावून सुटकेची वाट पाहणे आणि सुटल्यावर उपोषणावर जोर लावणे. सरकार जसे उठून बसले आहे, मीही तेच करणार असे ती ठामपणे सांगते. आज समाजसेवेलाही मार्केटिंग आणि पीआरची गरज आहे. ती कोणत्या राज्यकर्त्यांना ओळखत नाही. तिचा दिल्लीशी काहीच संबंध नाही. कुणी बाबा किंवा आध्यात्मिक गुरू तिला ओळखत नाही हेच तिचे दुर्दैव. नाही तर आज मणिपूरमध्येदेखील रामलीला मैदान भरले असते. आय. एम. शर्मिला अशा टोप्या कुणी छापल्या नाहीत आणि छापणारही नाही, पण शर्मिलाला त्याचे काहीच वाटत नाही. तसे पाहिले तर देशात जागोजागी रामलीला मैदान सजले पाहिजे. कुचकामी सरकार असले की अन्यायाशिवाय दुसरे काय मिळणार! आज संपूर्ण देश सरकारविरोधात भडकला आहे. प्रत्येकाला बदल हवा. जेवढे रस्त्यावर उतरले तेवढ्यांनी जरी मतदान केले तर बदल घडेल. शर्मिला एक सत्याशी आपली भेट घडवणारी एक मालिका आहे, ती जाहिरात नाही. तिचे पोस्टर नाही लागले. तिच्या जाहिराती टीव्हीवर नाही दिसल्या. मुळात देशाला शर्मिला कोण हेही नीट माहीत नाही. आपण फक्त जाहिरातीत गुंतलोय. जरा डोळे उघडा. टीव्हीवर जाहिराती पाहताना चुकून एखादी चांगली मालिकाही पाहा.
शर्मिलाच्या ‘गाजावाजा’विना चाललेल्या उपोषणाचे फळ तिला मिळो व तिच्या शौर्याची मालिका संपूर्ण जगात पसरो ही माझी इच्छा आहेे. पण एकमात्र आहे जाहिरातींनी मनोरंजन ‘सॉलिड’ होते.